केज /प्रतिनिधी
मृग नक्षत्र उजाडले असून पेरणीचे वेध लागलेल्या केज तालुक्यातील शेतकऱ्यांची शासनाच्या अनुदानित सोयाबीन बियाणे वाटप योजनेने अक्षरशः कोंडी केली आहे. एकीकडे ऑनलाईन लॉटरी (ड्रॉ) प्रक्रियेवर शंका घेतली जात असताना, दुसरीकडे टोकन मिळूनही दुकानदार बियाणे देत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यातच तालुक्यातील मुख्य जबाबदार अधिकारी रजेवर गेल्याने शेतकऱ्यांना वाली कोण, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
मिळालेले बियाणे गेले कुठे? ‘ड्रॉ’वर संशयाची सुई!
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने बीड जिल्ह्यासाठी ७,००० क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध करून दिले होते. हे बियाणे मिळवण्यासाठी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. मात्र, प्रशासनाने काढलेल्या ऑनलाईन ‘ड्रॉ’च्या पारदर्शकतेवर आता शेतकऱ्यांकडूनच मोठी शंका घेतली जात आहे. ज्या ठराविक शेतकऱ्यांची नावे या यादीत आली, त्यांच्या निवडीबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
टोकन असूनही रिकामे हात; दुकानदारांचे हात वर!
या योजनेचा घोळ एवढ्यावरच थांबलेला नाही. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रक्रियेतून रीतसर बियाण्याचे टोकन मिळवले आहे, ते जेव्हा दुकानात जात आहेत, तेव्हा बियाणे दुकानदार त्यांना बियाणे देण्यास नकार देत ‘हात वर’ करत आहेत. यामुळे “टोकन मिळाले, मग बियाणे गेले कुठे?” असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रमुख मुद्द्यांची चौकशी होणार का?
तालुक्यातील एकूण किती शेतकऱ्यांना बियाण्यांचे टोकन वाटप करण्यात आले?
किती क्विंटल बियाण्यांचे टोकन दिले गेले आणि प्रत्यक्षात दुकानदारांना शासनाकडून किती माल पुरवला गेला?
सद्यस्थितीत संबंधित दुकानदारांकडे किती बियाण्यांचा स्टॉक (साठा) शिल्लक आहे?
अधिकारी रजेवर, शेतकरी वाऱ्यावर!
या सर्व गोंधळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि दुकानदारांवर वचक ठेवणे ज्यांचे कर्तव्य आहे, ते तालुका कृषी अधिकारी सध्या रजेवर गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ते कोणाचाही फोन उचलत नसल्याने शेतकऱ्यांना दाद मागायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार पणामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरी पूर्णपणे वाऱ्यावर सोडले गेले आहेत.
कृषी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा
या गंभीर परिस्थितीची दखल घेत केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर यांनी प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे.
”सोयाबीन बियाणे वाटपातील गोंधळ तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना बियाणे मिळाले पाहिजे. येत्या सोमवारपर्यंत जर संबंधित यंत्रणेने हा सावळागोंधळ सुधारला नाही आणि वाटप प्रक्रिया सुरळीत झाली नाही, तर केज तालुका कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल,” असा थेट इशारा डॉ.वासुदेव नेहरकर यांनी दिला आहे.
आता या इशाऱ्यानंतर तरी झोपलेले कृषी प्रशासन जागे होणार का आणि सोमवारपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात बियाणे पडणार का, याकडे संपूर्ण केज तालुक्याचे लक्ष लागले आहे.



